माणसानं सर्वच क्षेत्रात केलेली प्रगती हे त्याच्या प्रगल्भतेचं, जिज्ञासेचं द्योतकच आहे. इतर प्राण्यांपेक्षा वेगळा असलेला अलौकिक सामर्थ्य लाभलेला मेंदू माणसाचं जगणं बदलवत गेला. त्याच्या विचार करण्याच्या संकल्पना विकसित होत गेल्या आणि संपूर्ण मानव जातीचा विकास होत गेला. ह्या विकासाची एक पायरी म्हणजे माणसाचं बोलायला सुरूवात करणं, ज्याला आपण भाषेचा वापर करणं म्हणतो. जगाच्या पाठीवर जिथं जिथं माणूस पोहोचला तिथं तिथं त्यानं आपली अशी एक स्वतंत्र बोली तयार केली. नवी ओळख निर्माण केली. या भाषेमुळे मानवाचा माणूस व्हायला लागला.
अभिज्ञान पर्व विशेषांक 'भाषा' |
ज्या भाषेनं माणसांना एकत्रित केलं. स्वतंत्र ओळख दिली त्याचं महत्त्व व्यवहारापुरतं जगताना येऊ पाहातंय. ही भावशून्य करत जाणारी प्रक्रिया बदलायला हवी. पुन्हा एकदा शब्दांची जादू माणसाला अनुभवता यायला हवी. ही काळाची गरज आहे. कारण अनेक कुटुंब अनेक भाषा ज्ञात असूनही मुकी होऊ लागली आहेत. माणसा माणसांतला संवाद खुंटत चालला आहे. माणसाची खरी ऊर्मी त्याच्या भावना आहेत. त्या जपायच्या असतील तर आपल्या भाषेतून व्यक्त होणं आवश्यक आहे.